ashintosh


खरड डागणे!
नोव्हेंबर 29, 2007, 4:07 pm
Filed under: तंत्र, माहिती

स्क्राईबफायर चा वापर करत या अनुदिनीला (ब्लॉग) पुन्र्जिवन देण्याचा प्रयत्न करत आहे. स्क्राईबफायर हे एक फायरफॉक्स एक्स्टेन्शन आहे. ज्याचा वापर करून कुठलीही किरकोळ खरड तुम्हाल्या तुमच्या अनुदिनीवर डागता येत.

याचा वापर करत तुम्ही अक्षरांचा रंग, आकार, लेखनशैली, (अधोरेखन, काटछाट, ठळकपणा , वेगळेपणा , चित्रे,दुवे, इत्यादीसाठी सहजपणे करू शकता. सध्या इतकेच.
 

Powered by ScribeFire.



सहज सरल सापेक्षता – 5
ऑक्टोबर 13, 2007, 6:39 pm
Filed under: तंत्र, भाषांतर, शिक्षण

या आधी…
===
ही आईनस्टाईनसाठी मोठी झेप होती. आनंदानं त्यानं केवळ हवेत उडी मारायची बाकी ठेवली होती. त्याच्यासाठी ठीक होतं. पण आम्हाला तर त्याला कोंडून ठेवावसं वाटत होतं. त्याचं म्हणणं होतंच असं विचित्र!
===
आमच्यातलं कुणीसं म्हणालं, “आईन्या, वेड लागलंय तुला. अरे हेच बघ, तू ही ओढ तयार करायची म्हणतोस, ही अशी सूर्यासमोर ठेवायला. तुला ही ओढ म्हणजे काय पोरखेळ वाटते? अरे अशी कोणती ओढ आहे की जी मनात आलं की दिसेल नि मनात आलं कि रुसेल? तेही तू ‘स्थिर’ कशाला म्हणतोस यावरून. ओढ अशी थोडीच असते, त्याला नाईलाज आहे.”  आईनस्टाईन म्हणाला, “हां! हेच तर मी म्हणतोय. ही ओढ आहेच अशी अवखळ, नाटकी.” आम्ही म्हटलं, “बास झालं आईन्या. हरलास तू. तुझी ‘ती’ ओढ नाटकीच होती तर.” एक कागदाची थप्पी पुढं सारत तो म्हणाला,” हे घ्या. वाचा हे नि बसा बरळंत.”

आम्ही वाचू लागलो. म्हणजे तसा प्रयत्न केला. साधारणसा. हे काहीतरी अजब गौडबंगालच होतं.  काहिंना समजलंही म्हणे, बाकीचे ओळी मोजत होते. “हम्म!!”.  काहीजण म्हणाले, “आणि जरी हे खरं असलं, तरी आपली जुनी थापच बरी आहे.” अहो या पठ्ठयानं जे काही लिहीलं त्याचा घड मागंच लागत नव्हता!

पण हरमन- नाव आहे, म्हणाला त्याला काहीतरी खास समजलं म्हणे. त्यानं नि आईनस्टाईननं मिळून एक नवीनच कथा रचली. ती काहिशी अशी…

तुम्हाला आपण कसं हालू शकतो हे माहितंच आहे. वर-खाली, डावी-उजवीकडे आणि पुढे मागे. हरमन म्हणाला, “यात आपण आणखी एकाची भर घालु – काळ. बरोबर, ही सुद्धा हालण्यासाठीची एक दिशा.” “चार काय… ठीक.” सारे म्हणालो.  आता दोघे थोडे गंभीर झाले. म्हणाले, “आता हे चारही पर्याय वापरत आपण काय काय करू शकतो ते पाहू. समजा हे चार प्रकार वाकवता आले तर? अंहं! असं नव्हे की यात जी गोष्ट आहे ती वाकवायची. पण हे चार पर्यायच वाकवले तर?” काही म्हणाले, “आता आणखी वाकड्यात शिरू नका बाबांनो.” पण ते दोघे थांबणारे नव्हते, म्हणाले “हे घ्या!”

समजा वस्तूमानामुळं हे पर्याय वाकत असले तर? जिथं जितकं वस्तूमान जास्त तिथं तितकाच मोठा खळगा. समजा दोन जागा आहेत. ‘क’ आणी ‘ख’. आपापल्या काळातल्या. एक एका वस्तूमानाच्या या बाजूला आणि दुसरी त्या बाजूला. आता एखादी गोष्ट ‘क’ कडून ‘ख’ कडं गेली, तर कशी दिसेल? तुम्ही म्हणाल सरळ रेषे सारखी. खरं तर हो ही आणि नाही ही. रेष आहे खरी. पण वाकलेली. जेंव्हा ती त्या खळग्यातून प्रवास करते ना, त्या भागापुरती.  ही रेष एका रेषे सारखी तेंव्हाच दिसेल जेंव्हा आपण चारही मिती लक्षात घेऊ. तुम्ही ‘क’ कडून ‘ख’ कडं बघत असाल तर फक्त टिंबच दिसेल. जर काळ लक्षात घेता येत नसेल तर ही रेष मध्येच काहीशी भरकटलेली दिसेल.  असं करू. फार मोठं काही तरी घेऊ. सूर्य. सूर्य घ्या.  आता ‘क’ आणी ‘ख’ सूर्याच्या जवळ असूद्यात. एकाच जागी पण वेगवेगळ्या काळा मध्ये. थोडावेळ जाऊ द्या. ‘क’ कडून ‘ख’ कडं जाणारी रेष आता तुमच्या-माझ्यासाठी एक वक्राकार कमान असेल.  (लक्षात घ्या आपण पर्उठ्वीसोबत प्रदक्षिणेवर आहोत.) एक अशी कमान की जी फिरतच राहिल नि जिच्या केंद्र भागी असेल आपला सूर्य.

“पाहिलंत!” अल्बर्ट म्हणाला. “तुम्ही म्हणाता सूर्याला ओढ आहे. पण आपण जेंव्हा सूर्या भोवती फिरतो, त्यालाच अक्ष बनवून,  हे  असे या चार मितीं मध्ये, तेंव्हा आपण खरं तर एका सरळ रेषेतच जात असतो. आपण प्रदक्षिणा घालतच नाही आहोत मुळी. म्हणूनच म्हणतो कि ही ओढ फसवी आहे, नाटकी आहे. तुम्हाला सरळ रेषेत रहायला दुसर्या कुढल्याच ओढीची गरज नाही!” आमच्या पैकी आणखी काही जणांना काहीतरी समजलं. ते म्हणाले, ” तुम्ही दोघं हा नाद सोडून का नाही देत? हे खरं असूही शकेल, पण भलतंच तिरपागडं आहे.” “मग घ्या खात्री करून!”‘

आता आम्ही या सार्याचा खरे खोटेपणा प्रत्यक्षपणे बघायचं ठरवलं…

त्याच्या म्हणण्यानुसार, सूर्याचे किरण न्यूटनच्या म्हणण्यापेक्षा थोडे जास्तच लालसर होते. ते खरंच होतं. त्याच्या म्हणण्यानुसार मंगळ न्यूटनच्या तुलनेत थोडासा दूर होता. तो ही होता. विशेष म्हणजे, जे आता वरच्यावर सांगितलं जातं, तेच ते, दिवसा तारे दाखवणारं उदाहरण! तुम्हाला माहितच आहे, जेंव्हा चंद्र सूर्य आणि पर्उथ्वी यांच्या मध्ये येतो, सूर्यग्रहण. याच वेळी तुम्हाला सूर्याच्या अगदी जवळचे तारे नक्की कसे आहेत हे पाहायची संधी मिळते. (अर्थातच आकाशात त्याच्या जवळ दिसणारे. आलंच असेल लक्षात. ) आम्ही त्यांच्याकडं बारकाईनं पाहिलं. पुस्तकाच्या आधारानं ते तारे कुठले आहेत, हे ही पाहिलं.  या तार्यांपासून आपल्याकडं येणारी सूर्यकिरणं सूर्यापासून येताना वाकतात. अल्बर्टनं सांगितलं की ते किती वाकतील. न्यूटननं ही ते वाकतील असं सांगितलं होतंच पण त्याच्या तुलनेत अल्बर्ट ची वक्रता जास्त होती. साधारण दुप्पट. तर मग आम्ही तार्यांकडं बघत होतो नि हातातल्या पुस्तकात. याचा प्रयोगाचा निष्कर्ष तुम्हीही मला सांगू शकाल.

आम्ही आंवढा गिळत, मटकन खाली बसलो. थोड्या वेळानं अल्बर्टला म्हणालो, “खरंच डोकेबाज आहेस बाबा. हे सारं तुला सुचलं कसं?” “आता तू ही हातातली नोकरी सोड नि चल आमच्या बरोबर”

आम्हाला आता अल्बर्ट आवडायला लागला होता.

~ समाप्त ~

थोडक्यात, हे सारं असं होतं. बापरे, वेळ तर पाहा किती झालीय ती! मी बराच वेळ काढला ना? चला. आता आटपतो. तुम्ही लक्ष देऊन वाचता हे पाहून बरं वाटलं. या उपद्व्यापाचा काहीतरी उपयोग झाला असेल अशी आशा आहे.

तळटीप

मूळ लेखन : ब्रायन रेटर (मपेट लॅबस्)
मूळ लेख : छोट्या छोट्या शब्दात सापेक्षता.
वैशिष्ट्य: मूळ लेखामालेचे वैशिष्ट्य म्हणजे सारी लेखमाला चार किंवा त्याहूनही कमी अक्षरांच्या शब्दात लिहिली आहे.
टिप्पणी : मूळ लेखमाला अप्रतिम आहे. भाषांतर भाषांतर वाटल्यास, विषयांतर वाटल्यास, गोंधळात टाकणारे वाटल्यास वा अर्थ बिघडवणारे वाटल्यास त्याचा दोष आहे. लेखाच्या सुरसतेचे, सुलभतेचे सारे श्रेय मूळ लेखकाचे आहे. या विषयावर अधिकार वाणीने बोलण्याची त्याची प्राज्ञा नाही, मूळ लेख वाचून अर्थाचा अनर्थ होत असल्याचे लक्षात आल्यास त्याच्या नजरेस आणून द्यावे ही विनंती. त्याला रुचलेला लेख चोखंदळ वाचकांपुढे पोहोचवण्याचा हा प्रयास मात्र होता.

Powered by ScribeFire.



सहज सरल सापेक्षता – 4
ऑक्टोबर 13, 2007, 6:38 pm
Filed under: तंत्र, भाषांतर, माहिती, शिक्षण

न्यूटन म्हणायचा,  “एक ताटली घ्या. त्यात थोडसं दुध घ्या. आता ताटली बोटावर धरून फिरवा. काय होतं? दूध कडेला सरकत सरकत बाहेर सांडतं.” “त्यात काय विशेष?” हेच ना? अहो फिरण्यामुळं ओढ निर्माण होते, दूध बाहेर सांडतं. असंच ना? पण जर मी दूध ‘स्थिर’ होतं असं म्हणायचं ठरवलं तर?

याचाच अर्थ आकाश बिकाश हे सारं फिरत आहे आणी ही ताटली नि दूध ‘स्थिर’. असंच ना? मग सांगू शकाल हे असं दूध बाहेर का सांडतं? अशा ‘स्थिर’ दुधाला बाहेर उडी मारायला भाग पाडलं तरी कुणी?

याच वेळी न्यूटन पुढं आला. म्हणाला, ” होय. निरपेक्ष स्थिरता नसतेच. तुम्ही जेंव्हा जागा बदलता, तेंव्हा कुणी म्हणेल तुम्ही बदलता, कुणी म्हणेल नाही. ते ठीक ही आहे. पण या ओढीचं तर तसं नाही ना! ओढ आहे ही आहेच.”

पण आईनस्टाइनचं मन घट्ट. त्याला पक्कं माहित होतं कि यात यापेक्षाही अधिक काहितरी दडलेलं आहे.  मी मग न्यूटनला म्हणालो, “आपण या जुन्या ओढी बरोबरच आणखी एक ओढ आणू!” (खरं तर सुरुवातीला त्यालाही ही कल्पना थोडी विचित्रच वाटली.) सरळ शब्दात सांगायचं तर.. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही नवी ओढ बरीचशी जुन्या ओढीसारखीच होती. 

आता असं करू, मी तुम्हाला एका खोक्यात बसवलं. आणि ते खोकं एका पोकळीत ठेवून दिलं. (इथं मला निरपेक्ष पोकळी अपेक्षित नाही बरं. थोडं बाकीच्या ओढीं पासून दूर राहिलं तरी पुरे आहे. हवं तर एखाद दोन तारे/तारका वगैरे घ्या सोबतीला. फारसे जवळ घेऊ नका म्हणजे झालं. ठीक?) आता समजा मी त्या खोक्याला एक दोर बांधला. त्याचं दुसरं टोक बांधलं एका गलबताला. मी त्या गलबतात बसलो नि सुसाट वेगाने पुढे सरकलो. वेग आणखी वाढवला. आणखी. आता जोवर मी तुम्ही सारख्याच दरानं वेग वाढवत आहात याची खबरदारी घेईन, तोवर तुम्हाला या इथे जशी ओढ जाणवते तशीच ओढ जाणवेल. जर तुमच्या कडं एक शिशाचा आणी एक लाकडाचा चेंडू असेल नि तुम्ही दोन्ही एकाच वेळी सोडले, तर ते एकाच वेळी खाली पडतील. थोडं विचित्र वाटतं ना? गोंधळलात? आम्ही ही गोंधळलो होतो.

हे नक्की असं का होतं हे सांगायला कुणीच धजावत नव्हतं. निदान तोवर तरी. तो अल्बर्ट, त्यानं तो चेंडू उचलला नि सुटला पळंत. अगदी दिसेनासा झाला. सुरवातिला वर्षभर. नंतर मग आणखी दहा वर्षं. अहो खरंच! इतका वेळ! आणि खरं सांगायचं तर हे बागेत फेरफटका मारण्यासारखं मुळीच नव्हतं. आमच्या पैकी काही जण तर म्हणाले कि तो परतणारच नाही. पण जेंव्हा तो परत आला, नि म्हणाला, “ही जी नवी ओढ आपल्याला न्यूटननं दाखवली, ती खरं तर जुनीच आहे. ‘तशीच’ नव्हे, तीच आहे. या दोन्ही अगदी सारख्या आहेत.  मग तुमच्या लक्षात येईल की एक खरी अशी ‘ओढ’ असंतच नाही.”

आलं का लक्षात तो काय म्हणाला ते? जेंव्हा तुम्ही त्या खोक्यात बंद होता, तुम्हाला नुसती ‘घरच्या सारखी’ ओढ भासत नव्हती, तर ही ओढ त्याच प्रकारची होती. आता जर तुम्ही म्हणालात, “आता जर त्या खोक्यालाच ‘स्थिर’ मानायचं ठरवलं तर? आता काय? आता ते चेंडू कशानं खाली पडले?” तर आइन्स्टाईन तुम्हाला म्हणेल, “ही जी पोकळी होती ना आजुबाजूला, तीच  एका ठराविक दरानं वेग वाढवत होती, ज्याची ओढ तुम्हाला नि तुमच्या खोक्याला जाणवली.” तुम्ही म्हणाल, “ए, बस झालं हं आता. त्या पोकळीतलं वस्तुमान माझ्यावर अशी एखादी ओढ आणायला फाऽऽर दूर आहे.” पुन्हा आइनस्टाईन म्हणेल, “नाहीच. तुम्हाला कळलंच नाही तर! त्या पोकळित किती वस्तुमान आहे, याचा प्रश्न नाहीच मुळी! त्याचा पोकळीत वस्तुमान आहे, यातंच सारं आलं. तुम्ही नि तुमचं खोकं सोडून सारं काही.”

तीच गोष्ट त्या दुधाची. तुम्ही म्हणालात, “ताटली स्थिर आहे”, तर तो म्हणेल, “बाकि सारं (विश्व) फिरत आहे कि ज्यामुळं दुधाला ही ओढ आहे, ज्यानं ते बाहेर सांडतं.”

थोडक्यात काय, न्यूटन म्हणाल कि तुम्ही एखाद्या वेळी स्थिर आहात की नाही हे नक्की सांगता येणं शक्य नाही. तुम्ही म्हणता मी हालतोय, बाकी सारं स्थिर आहे काय, किंवा याच्या उलट काय. एकूण अर्थ एकच. पण आईनस्टाईन म्हणाला इतकंच नव्हे, तर तुम्हाला एखादी ओढ आहे, कि नाही हेही सांगता येणं अशक्य आहे. सरते शेवटी, तुम्ही कुढल्याही वेळी, कुठल्याही प्रकारे, ‘स्थिर’ असू शकत नाही. तुम्ही वर-खाली, इकडं तिकडं कशाही उड्या मारा हवं तर, पण तरिही तुम्ही स्वत:ला स्थिर म्हणवू शकताच.

ही आइनसाठनची मोठी झेप होती. आनंदानं त्यानं केवळ हवेत उडी मारायची बाकी होती. त्याच्यासाठी ठीक होतं. पण आम्हाला तर त्याला कोडून ठेवावसं वाटत होतं. त्याचं म्हणणं होतंच असं विचित्र!

(क्रमश:)

Powered by ScribeFire.